" महात्मा गांधींपासून आपण काय शिकलो?" या विषयावर ता. २९ डिसेंबर, १९६९ रोजी आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून केलेल्या भाषणातून.
देशाला राजकीय स्वातंत्र्य मिळण्यापेक्षाही आर्थिक स्वातंत्र्याची अधिक गरज आहे हे जाणून महात्मा गांधींनी स्वदेशीच्या पुरस्कारावर आपले लक्ष केंद्रित केले. भारतात उत्तम प्रतीचा कापूस व कापड तयार होत असतानाही लेन्कॅशायर येथील गिरण्यांत निर्मिती होऊन हिंदुस्थानात येणाऱ्या कापडाविरुद्ध त्यांनी आपला आवाज उठवला. त्याप्रमाणे स्वदेशात तयार होणाऱ्या प्रत्येक वस्तूची बाहेरून आयात थांबविण्यात आली पाहिजे, असेही त्यांनी कटाक्षाने सांगितले. अन्नधान्यासारख्या दैनंदिन जीवनाला आवश्यक अशा सर्व वस्तूंपासून ते जीवनमान उंचावणाऱ्या वस्तूंच्या बाबतही देशात स्वावलंबन झाले पाहिजे याचा त्यांनी पाठपुरावा केला. इतकेच नव्हे तर हिंदी जनतेने विदेशी बाजारपेठेबरोबरच स्वतःची सागरी वाहतूक वाढविली पाहिजे याबद्दलही त्यांचा आग्रह होता.
आर्थिक प्रगतीचे किंवा विकासाचे महत्त्व महात्माजी पूर्णपणे ओळखून होते. आपल्या देशाने औद्योगिक प्रगती साधणे अगदी आवश्यक आहे याची त्यांना जाणीव होती. तथापि देशातले हे संक्रमण साधताना, मानवी मूल्ये आणि आर्थिक प्रगती या दोन्हीमधील संघर्ष त्यांना नको होता. कुठल्याही एका वर्गाने दुसऱ्या वर्गाचे शोषण करू नये याबद्दल ते जागरूक होते. महात्माजींच्या "सर्वोदया"त सर्वांचा उदय हीच कल्पना प्रामुख्याने सामावली जात असे. ईश्वराने जर गरिबाला भेटण्याचे ठरविले तर भाकरीच्याच रूपाने त्याला भेटावे लागेल असे ते म्हणत.
उद्योगधंदे किंवा कारखाने यांच्या चालकांना आपण मालक आहोत अशा वृत्तीने न वागता हाती घेतलेल्या उद्योग धंद्याचे केवळ विश्वस्त आहोत ही जाणीव सतत डोळ्यापुढे ठेवण्यास त्यांनी सांगितले. आपल्या कारखान्यातून निर्माण होणाऱ्या संपत्तीपैकी मालकांनी आपल्या गरजेनुसार पण शक्य तितका कमी भाग स्वतःकरिता ठेवून उरलेला भाग कामगारांच्या आणि त्याचप्रमाणे धंद्याच्या वाढीकरिता उपयोगात आणावा असे त्यांनी आवर्जून प्रतिपादन केले. मुलांना पुष्कळ धनदौलत ठेवण्या ऐवजी त्यांना योग्य प्रकारे शिक्षण देणे ही अधिक महत्त्वाची गरज आहे असे महात्माजी म्हणत.
उत्पादन केलेल्या मालाचा साठा करून किंमती वाढविण्याच्या प्रयत्नांचा त्यांनी सदैव धिःकार केला. आर्थिक समृद्धी ही नैतिक मार्गानेच साधली पाहिजे याबद्दल त्यांनी कधीही तडजोड केली नाही. मालक आणि कामगार यांचेमध्ये बेबनाव निर्माण न होण्याइतके जिव्हाळ्याचे संबंध असावयास हवेत हे त्यांनी पहिल्या पासून सांगितले. "मोर्चा", "संप", "घेराव"च्या आजच्या या काळात महात्माजी असावयास हवे होते असे प्रत्येक सुबुद्ध नागरिकाला वाटल्यावाचून रहात नाही.
महात्मा गांधी यांनी श्रमाच्या प्रतिष्ठेकडे नेहमीच लक्ष दिले. प्रत्येक व्यक्तीने दररोज निदान आठ तास तरी शारीरिक किंवा मानसिक श्रम केले पाहिजेत, त्याशिवाय त्याला जेवण्याचा अधिकार राहणार नाही असे ते म्हणत. आपल्या देशामध्ये खेड्यात माणसांची विपुलता आहे. परंतु अशा व्यक्तींना आपल्या पोटासाठी शहराकडे धाव घ्यावी लागते, त्याऐवजी ग्रामोद्योग व हस्तव्यवसाय यांना चालना देऊन आपल्या परिसरातील गरजा भागविण्याचा प्रयत्न केला पाहिजे असा महात्माजींचा दृष्टिकोन होता. देशातील हजारो लोकांना बेकार करणाऱ्या स्वयंचलित यांत्रिकीकरणाला त्यांचा विरोध होता. पण मोठमोठी अवजड कामे सुलभ रीतीने पार पडण्यास आणि सर्वसामान्य व्यक्तीला जीवन देण्यास मदत करतील अशा यंत्रांचा त्यांनी नेहमीच पुरस्कार केला. तथापि पैसा किंवा यंत्र यापेक्षा माणसांचे महत्त्व अधिक आहे असे ते नेहमी सांगत.
शेती करणारे शेतकरी किंवा ग्रामीण भागातील सर्वसाधारण लोक आपल्या दैनंदिन जीवनातील बराचसा भाग आळसात व निष्क्रियतेत घालवतात. अशा व्यक्तींना जर दुसरा एखादा जोडधंदा येत नसेल तर किमान त्यांनी चरख्यावर सूत काढून खादीच्या निर्मितीला हातभार लावावा. मुलांच्या शिक्षणातही हस्तव्यवसायाला महत्त्व दिले जावे असे त्यांनी आवर्जून सांगितले. त्याचप्रमाणे बेकारीमुळे होणारा मानवी शक्तीचा अपव्यय टाळला पाहिजे याबद्दल त्यांचा कटाक्ष असे.
हातचरख्यावर सूत काढण्याची कल्पना चालू "जेट" युगात जुनाट वाटण्याचा संभव आहे. परंतु खेडेगावात किंवा ज्यांना दुसरा कसलाही व्यवसाय करता येत नाही त्यांच्यासाठी अगदी कमीत कमी साधनांत व खर्चात उपलब्ध होऊ शकणाऱ्या सूतकताईचे महत्त्व लक्षात घेतले जाणे जरुरीचे आहे. शहरापेक्षा ग्रामीण भागात जितके उद्योगधंदे वाढविता येतील तितके वाढवावेत आणि अशा प्रकारे आर्थिक प्रगतीचे विकेंद्रीकरण व्हावयास हवे असा त्यांचा आग्रह असे.