आबासाहेब गरवारे यांनी २२ डिसेंबर १९७३ रोजी आपल्या परिपूर्ण जीवनाची सत्तर वर्षे पूर्ण केली. ‘महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स’ या संस्थेने २७ डिसेंबर १९७३ रोजी के. सी. कॉलेज, चर्चगेट, मुंबई येथे एका भव्य सोहळ्यात त्यांचा सत्कार केला. व्यावसायिक, सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातील अनेक प्रतिष्ठित व्यक्ती या समारंभास उपस्थित होत्या. हा समारंभ प्रतिष्ठित उद्योगपती श्री. शंतनुराव किर्लोस्कर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला, तर महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री मा. वसंतराव नाईक प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. या कार्यक्रमानिमित्त संस्थेने ‘आबासाहेब गरवारे - गौरव ग्रंथ’ प्रकाशित केला. या ग्रंथात अनेक मान्यवरांनी आबासाहेबांना शुभेच्छा दिल्या; तर अनेक राजकीय-सामाजिक नेते, व्यावसायिक, सहकारी आणि संबंधित व्यक्तींनी लेखांच्या माध्यमातून आपले अनुभव व आठवणी मांडल्या.
पुण्यातील महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी (MES) या संस्थेने महाराष्ट्रभर शाळा, महाविद्यालये आणि व्यावसायिक संस्था स्थापन करून शिक्षणक्षेत्रात भरीव कामगिरी केली. या कार्याने प्रभावित होऊन आबासाहेबांनी संस्थेला लक्षणीय आर्थिक सहाय्य दिले. त्यांच्या या योगदानाची दखल घेत, संस्थेने आपल्या प्रमुख संस्थांपैकी एका संस्थेचे नाव गरवारे कुटुंबाच्या सन्मानार्थ ठेवले. ६ ऑगस्ट १९७२ रोजी एका देखण्या समारंभात आबासाहेब आणि विमलाबाई यांचा गौरव करण्यात आला आणि त्या महाविद्यालयाचे नामकरण करण्यात आले. या प्रसंगी संस्थेने ‘नामकरण स्मरणिका’ प्रकाशित केली. या स्मरणिकेत संस्थेचा इतिहास, यशस्वी वाटचाल तसेच गरवारे समूहाची माहिती असलेले लेख समाविष्ट आहेत.
म. ए. सो. आबासाहेब गरवारे महाविद्यालय आणि म. ए. सो. गरवारे कॉलेज ऑफ कॉमर्स या दोन्ही संस्थांच्या ग्रंथालयांतून ‘आबासाहेब गरवारे - गौरव ग्रंथ’ आणि ‘नामकरण स्मरणिका’ हे ग्रंथ संस्थेने उपलब्ध करून दिले. लेखनाच्या सत्यतेसाठी संस्थेतील प्राध्यापक आणि वरिष्ठ कर्मचाऱ्यांनी मोलाचे सहकार्य केले. या सहकार्याबद्दल ‘व्हिजन महाराष्ट्र फाऊंडेशन’ दोन्ही संस्थांचा शतशः ऋणी आहे.
आबासाहेबांबरोबर काम केलेल्या काही वरिष्ठ सहकाऱ्यांनी लेखन अधिक परिपूर्ण करण्यात महत्त्वपूर्ण योगदान दिले. त्यांचाही मन:पूर्वक ऋणनिर्देश येथे करावासा वाटतो.
संपादक