२७ डिसेंबर १९७३ रोजी महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सतर्फे आबासाहेब गरवारे यांच्या ७० व्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या सत्काराचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आणि त्या प्रसंगी एका गौरवग्रंथाचे प्रकाशन करण्यात आले. या ग्रंथात अनेक मान्यवर, सहकारी, तसेच कौटुंबिक सदस्यांनी आबासाहेबांच्या आठवणींवर आधारित लेख प्रसिद्ध केले आहेत. हा गौरवग्रंथ आबासाहेब गरवारे यांचे व्यक्तिमत्त्व, स्वभाववैशिष्ट्ये, व्यावसायिक व कौटुंबिक जीवन, सामाजिक जाणिवा आणि त्यांनी मिळवलेल्या लोकमान्यतेचा विविध अंगांनी वेध घेतो. या गौरवग्रंथाची प्रत आबासाहेब गरवारे महाविद्यालयाच्या ग्रंथालयातून अभ्यासासाठी उपलब्ध झाली. सदर लेखनात या ग्रंथातील मजकुराचा संदर्भ घेतला आहे. या संदर्भासाठी गौरवग्रंथ प्रकाशक आणि आबासाहेब गरवारे महाविद्यालयाचे मनःपूर्वक आभार.
तसेच, महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या पुणे येथील महाविद्यालयाचे नाव ‘आबासाहेब गरवारे कॉलेज’ असे ठेवण्यात आले. ६ ऑगस्ट १९७२ रोजी संस्थेच्या वतीने आबासाहेब आणि सौ. विमलाबाई गरवारे यांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. त्या निमित्ताने संस्थेने एक स्मरणिका प्रकाशित केली. या स्मरणिकेत अनेक मान्यवरांनी आबासाहेबांच्या कार्यावर आणि त्यांच्या व्यक्तिमत्त्वावर लेख लिहिले आहेत. सदर लेखनात या स्मरणिकेतील मजकुराचाही संदर्भ घेतला आहे. या संदर्भासाठी स्मरणिका प्रकाशक आणि आबासाहेब गरवारे महाविद्यालयाचे मनःपूर्वक आभार.