गरवारे समूहाच्या आज अस्तित्वात असलेल्या चार प्रमुख कंपन्यांच्या इतिहासाची व प्रमुख कार्यक्षेत्रांची माहिती पुढील प्रमाणे आहे. समूहाच्या या कंपन्या आहेत – १. गरवारे टेक्निकल फायबर्स लिमिटेड (GTFL), २. गरवारे हाय-टेक फिल्म्स लिमिटेड, ३. गरवारे मरीन इंडस्ट्रीज लिमिटेड, आणि ४. गरवारे सिंथेटिक्स लिमिटेड.
गरवारे टेक्निकल फायबर्स लिमिटेड (GTFL)
GTFL ची स्थापना १९७६ साली झाली. याची मूळ संकल्पना १९६० मध्ये स्थापन झालेल्या गरवारे फिलामेंट कॉर्पोरेशन या नायलॉन दोर व सुतळी उत्पादक कंपनीमधून आली. सुरुवातीला ‘Garfil’ या ब्रँडखाली दोर व सुतळी उत्पादित केली जात असे. नंतर कंपनीने उत्पादन क्षमता वाढवली आणि पॉलीप्रॉपिलीन मल्टीफिलामेंट यार्न, पॉलीप्रॉपिलीन स्टेपल फायबर, टेरी टॉवेल्स/कापड अशा विविध निर्यातक्षम उत्पादनांमध्ये विस्तार केला. GTFL ने फिशनेट वेबिंग्स, ब्रेडेड सुतळी आणि ‘हीट रेसिस्टंट’ रबरी टेन्शन टेप्स व धागे यांसारख्या तांत्रिक उत्पादनांत प्रवेश केला. २०१५ साली कंपनीला नाविन्यपूर्ण निर्यातदार म्हणून ओळख मिळाली आणि तिच्या मत्स्यपालनासाठीच्या केज नेट्स विशेषत्वाने गौरवण्यात आल्या. २०१७ मध्ये कंपनीने भारतीय संरक्षण दलासाठी अत्याधुनिक एरोस्टेट तयार करण्यासंदर्भात सहकार्य केले. २०१८ साली कंपनीचे नाव बदलून गरवारे-वॉल रोप्स वरून गरवारे टेक्निकल फायबर्स असे करण्यात आले आणि तिला भारतातील उत्तम काम करण्यासाठीची कंपनी म्हणून ओळख मिळाली. २०१९ मध्ये GTFL ने इकॉनॉमिक टाइम्स पॉलिमर पुरस्कार तसेच इंडिया ग्रीन मॅन्युफॅक्चरिंग चॅलेंज मध्ये सिल्व्हर मेडल पटकावले.
गरवारे हाय-टेक फिल्म्स लिमिटेड
या कंपनीची स्थापना १९५७ मध्ये गरवारे मोटर्स अँड इंजिनियर्स म्हणून झाली. सुरुवातीला ही कंपनी रिजिड PVC पाईप्स आणि मेटलाईज फिल्म्स तयार करत असे. १९८१ मध्ये ही कंपनी पब्लिक लिमिटेड बनली. औरंगाबादमध्ये बाय एक्सिअल ओरिएंटेड पॉलिस्टर फिल्म (BOPET) उत्पादनास सुरुवात करण्यात आली आणि १९७६ मध्ये गरवारे प्लॅस्टिक्स या कंपनीशी विलीनीकरण झाले. कंपनीचे नाव १९७७ मध्ये बदलून गरवारे प्लॅस्टिक्स अँड पॉलिस्टर झाले व पुढे गरवारे पॉलिस्टर, आणि शेवटी २०२१ मध्ये गरवारे हाय-टेक फिल्म्स असे ठेवले गेले. महत्त्वाच्या टप्प्यांमध्ये १९८३ मध्ये सन-कंट्रोल पॉलिस्टर फिल्म्स चे उत्पादन, एक्स-रे, पेस्ट फिल्म व ग्राफिक आर्ट फिल्म्स तयार करण्याची तंत्रज्ञान-प्रगती आणि १९९० च्या दशकात उत्पादनक्षमता वाढ यांचा समावेश आहे. २०१४ मध्ये कंपनीने बायो-अक्झिलरी पॉलीप्रॉपिलीन फिल्म (BOPP) तयार केली आणि २०२० मध्ये पेंट प्रोटेक्शन फिल्म्स क्षेत्रात प्रवेश केला. २००२-०३ मध्ये ‘टॉप एक्सपोर्टर ऑफ द ईयर’ हा मान सुद्धा कंपनीला प्राप्त झाला. परंतु केंद्रीय सरकारने मोटार गाड्यांना लावावयाच्या फिल्मवर आणलेल्या बंदीचा कंपनीच्या विक्रीवर फार मोठा परिणाम झाला.
गरवारे मरीन इंडस्ट्रीज लिमिटेड
या कंपनीची स्थापना 1975 मध्ये मॉडर्न नेट्स या नावाने झाली. ही कंपनी गरवारे ग्रुपचे संस्थापक श्री. बी. डी. गरवारे यांनी सुरू केली होती. १९८१ मध्ये कंपनीचे नाव बदलून गरवारे मरीन इंडस्ट्रीज असे करण्यात आले. सुमारे तीन दशके कंपनीने मासेमारीसाठी लागणाऱ्या जाळ्यांचे उत्पादन केले. यासोबत PVC फ्लोट्स आणि नायलॉन मोनोफिलामेंट चे उत्पादन सुद्धा केले. PVC फ्लोट्ससाठी नॉर्वेच्या बॅकेलाईट-फॅब्रिकन या कंपनीची तांत्रिक भागीदारी होती. मात्र, २०१३ च्या ऑगस्ट महिन्यात कंपनीने मासेमारी जाळ्यांचे उत्पादन थांबवले. सध्या कंपनीकडे जहाज दुरुस्ती विभाग कार्यरत आहे.
गरवारे सिंथेटिक्स लिमिटेड
श्री. बी. डी. गरवारे यांनी सप्टेंबर १९६९ मध्ये गरवारे सिंथेटिक ब्रिसल्स ही कंपनी स्थापन केली. ही कंपनी भारतात नायलॉन मोनोफिलामेंट्स, ब्रिसल्स, फिशिंग लाईन्स आणि PP ब्रिसल्स उत्पादनात आद्य ठरली. "GARFLON" या ब्रँडखाली ही उत्पादने विकली जातात. प्रारंभी आयात होणाऱ्या ब्रिसल्सना पर्याय देण्यासाठी कंपनी कार्यरत होती. १९९२ मध्ये कंपनीने पब्लिक लिमिटेड कंपनीचा दर्जा मिळवला. सध्या विविध प्रकारच्या ब्रश उद्योगांसाठी कंपनी ब्रिसल्स तयार करते आणि मोठ्या ग्राहकांना पुरवठा करते. कंपनीने सातत्याने उत्पादनक्षमता वाढवली असून तांत्रिक नवकल्पनांवर लक्ष केंद्रित केले आहे.